नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या मानहानी खटल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना हायकोर्टात उत्तर सादर करण्यास वेळ लागल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टाने केजरीवालांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.


अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली क्रिकेट बोर्डात नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, अरुण जेटलींवर बेच्छुट आरोप केले होते. यानंतर जेटलींनी केजरीवालांविरोधात दिल्ली हायकोर्टात 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता.

विशेष म्हणजे, या खटल्याच्या सुनावणीवेळी केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने, जेटलींनी केजरीवालांविरोधात 10 कोटीचा आणखी एक दावा दाखल केला.

या दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीवेळी संयुक्त रजिस्टार पंकज गुप्ता यांनी केजरीवालांना पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. केजरीवालांनी ही रक्कम युद्धात जखमी सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या कल्याण कोषात जमा करण्याचे आदेश केजरीवालांना दिले आहेत.

दरम्यान, संयुक्त रजिस्टार यांनी केजरीवालांना याआधी देखील 10 हजाराचा दंड ठोठावला होता. जेटलींचे वकील माणिक डोगरा यांनी केजरीवालांना 26 जुलैपर्यंत बाजू मांडण्याची सूचना न्यायालयाने केल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. पण केजरीवालांनी आपलं म्हणणं दोन आठवड्यानंतर कोर्टासमोर सादर केलं. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल सातत्याने विलंब लावत असल्याचा युक्तीवाद डोगरा यांनी केला.

यावर केजरीवालांचे वकील हृषिकेश कुमार यांनी न्यायालयासमोर माफी मागितली. यावर न्यायालयाने माफी देऊन, केजरीवालांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता याप्रकरणी 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.