मुंबई : देशभरातील बँकिंग व्यवहारांना दोन दिवस फटका बसण्याची चिन्हं आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी उद्या-परवा (मंगळवार 8 आणि बुधवार 9 जानेवारी) संपाची हाक दिली आहे.


सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघ या संपात सहभागी झाले आहेत.

अलाहाबाद बँकेने सेबीला पत्र पाठवून दोन दिवस बँक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर बँक ऑफ बडोदानेही बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

'एकजुटी'चा संप

देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 25 कोटी कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपाचा निर्णय दिल्लीत आयोजित देशातील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि सर्व उद्योगांतील देशपातळीवरील स्वतंत्र संघटनांच्या संयुक्त परिषदेत घेण्यात आला.

कोणाकोणाचा समावेश?

रेल्वे, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा उद्योग, तेल आणि वायू, स्टील, पब्लिक सेक्टर कारखाने, वाहतूक उद्योग, बेस्ट, एसटी, टॅक्सी-रिक्षा म्युनिसिपल कामगार, फेरीवाले, माथाडी कामगार आणि कॉंट्रॅक्ट आणि आऊटसोर्स्ड कामगार, अंगणवाडी महिला, आशा कामगार, शिक्षक, प्राध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, ईएसआय नर्स, नगरपालिका कामगार, अशा व्यापक जनसमूहांच्या प्रतिनिधींनी 8 आणि 9 जानेवारी रोजी संप पुकारला आहे.