नवी दिल्ली : मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून सांगितलं आहे. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र मोठ्या वादाला सुरुवात झाल्याने साहित्य संमेलन आयोजकांनी ही भूमिका घेतली आहे.


92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही आश्वासन पूर्ण करु शकत नसल्याचा उल्लेख आयोजकांकडून या पत्रात करण्यात आला आहे.


संमेलनाचे उद्घाटक म्हणून सहगल यांच्या नावाला शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता. तर इंग्रजी लेखिकेकडून मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मनसेनं विरोध केला होता. मात्र काही वेळातच मनसेचा हा विरोध मावळला होता. मात्र आता संमेलनाच्या आयोजकांकडून सहगल यांना उद्घाटनाला येऊ नका, असं सांगितलं गेलं असल्यानं साहित्य वर्तुळासह विचारवंतामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.


नयनतारा सहगल यांची प्रतिक्रिया


मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी घेतलेल्या निर्णयावर नयनतार सहगल यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीचे वाद समोर येत होते त्या पार्श्वभूमीवर जावं की नाही याचा विचार मी करत होते. मात्र मी यावं असा आयोजकांचा आग्रह होता. मात्र आयोजकांनी स्वत:च निर्णय घेत मला येऊ नका असं पत्राने कळवलं आहे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.


मी माझं भाषण आधीच आयोजकांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री माझ्याच व्यासपीठावर असणार आहेत हे मला माहीत नव्हतं. भाजपशासित राज्य आहे, त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना माझं भाषण आवडलं नसेल. माझ्या शब्दांमध्ये जरुर काही त्यांना घाबरवणारं असावं, असा अंदाज सहगल यांनी व्यक्त केला.


मी साहित्यिकांना आता देशात काय चाललंय, स्थिती का बिघडत चालली आहे, द्वेषाचं वातावरण का पसरवलं जातं आहे, हे हिंदू राष्ट्र आहे असं का सांगितलं जात आहे याबद्दल मी सांगणार होते, असं सहगल यांनी सांगितलं. कदाचित हे सगळं बोलणं आपल्या व्यासपीठावरुन ऐकणं मुख्यमंत्र्यांना सहन झालं नसतं, असंही सहगल म्हणाल्या


आयोजकांना वाईट परिस्थितीमध्ये हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे मी समजू शकते. यापुढेही मी महाराष्ट्रात येईल अशी मला आशा आहे. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने यायला आवडेल, अशी इच्छाही सहगल यांनी व्यक्त केली.


कोण आहेत नयनतारा सहगल?


लेखिका नयनतारा सहगल या देशात 'पुरस्कार वापसी'ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्वीकारत असल्याचं सहगल यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.


नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ (Rich Like Us) या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. मात्र दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरूणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.