नवी दिल्ली: आजपर्यंत तुम्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात कसा दिला, यासंबंधीच्या बातम्या वाचल्या असतील. पण आता आणखीन एका केंद्रीय मंत्र्याने सर्वसामान्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.


केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आपण प्रवास करत असलेल्या, विमानात एक मुलगी आणि तिच्या आजारी आईला मदतीचा हात दिला आहे. श्रेया प्रदीप असे या मुलीचे नाव असून ट्विटरच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली.

रांचीमध्ये राहणारी श्रेया प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या आजारी आईसोबत बंगळुरुला इंडिगोच्या विमानाने प्रवास करीत होते. तिच्या आईला चालता येत नसल्याने, प्रवासात त्रास होऊ नये यासाठी विमानाच्या दरवाजा जवळील XL सीट देण्यात आली.

जेव्हा हे विमान कोलकत्ता विमानतळावर काही काळासाठी उतरले, तेव्हा तिला देण्यात आलेल्या दोन्ही सीट केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि त्यांची पत्नीसाठी आरक्षित करण्यात आल्याचे समजले. श्रेया पुढे सांगते की, जेव्हा विमानात प्रवेश करताच तिच्या आजारी आईविषयी जयंत सिन्हा यांना माहिती समजली, तेव्हा त्यांनी स्वत: आपल्या सीट या दोघांना देऊन इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास निघून गेले.

या प्रवासानंतर श्रेयाने जयंत सिन्हा आणि इंडिगो एअरलाईन्सला ट्विटरवर टॅग करुन आभार मानले आहेत. ''अच्छे दिन, ते आहेत, जेव्हा केंद्रीय हवाई मंत्र्यांनी आपली प्रथम श्रेणीतील सीट मला आणि माझ्या आईला देऊ केली, आणि स्वत: इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्यास निघून गेले. धन्यवाद सर'' असे तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


श्रेयाच्या या ट्वीटला केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी तात्काळ दखल घेऊन रिप्लाय दिला.