मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असा दावा दाऊदचे वकिल श्याम केसवानी यांनी केला आहे. त्यासाठी दाऊदशी चर्चा करावी लागेल, असंही केसवानी यांनी सांगितलं.
दाऊदने पाच वर्षांपूर्वी ऑर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याच्या अटीवर भारतात येण्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र तत्कालीन सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा खुलासा केसवानी यांनी केला.
दाऊद भारतात येण्यासाठी तयार आहे. मात्र त्याला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येऊ नये, अशी अट दाऊदच्या हस्तकाने लंडनमध्ये माजी मंत्री राम जेठमलानी यांच्यासमोर ठेवली होती. तत्कालीन सरकारने अबू सालेम आणि छोटा राजन यांच्या अटी स्विकारल्या मात्र, दाऊदच्या अटींकडे दुर्लक्ष केलं, असा खुलासाही केसवानी यांनी केला आहे.
अबू सालेमने फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, अशी अट ठेवली होती. तर छोटा राजनने तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट ठेवली होती. या दोन्हीही अटी सरकारने मान्य केल्या. मात्र दाऊदच्या अटीकडे गांभिर्याने पाहिलं जात नसल्याची खंत केसवानी यांनी व्यक्त केली.
दाऊदने ठेवलेली अट किरकोळ आहे. मात्र सरकार तरीही दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरंच काही कारण आहे का, अशी शंकाही केसवानी यांनी उपस्थित केली.
दरम्यान दाऊदला भारतात आणण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. दाऊदला सुरक्षा पुरवली तर तो भारतात येईल. कारण यापूर्वीही सुरक्षेच्या अटीवरच दाऊदने भारतात येण्यास सहमती दाखवली होती, असा दावा केसवानी यांनी केला.