नवी दिल्ली : यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्यांतर्गत ट्विटरने (Twitter) काल केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांचे ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक केले होते. यानंतर, रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, ट्विटरची मनमानी आणि असहिष्णुता म्हणत त्यांना केवळ त्यांचा अजेंडा चालवण्यात रस आहे. आता ट्विटरची प्रतिक्रियाही या प्रकरणात समोर आली आहे. ट्विटरने म्हटले आहे की जेव्हा कॉपीराईटबद्दल कायदेशीर तक्रारी प्राप्त होतात तेव्हा अशी कारवाई केली जाते.

प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (AR Rehman) यांचं प्रसिद्ध गाणं 'माँ तुझे सलाम' वर ट्विटरने सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीकडून कॉपीराइट क्लेम मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अक्टच्या (DMCA) नोटीसनंतर रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट तात्पुरते ब्लॉक करण्यात आले होते.

ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या ट्वीटमुळे हे प्रकरण समोर आले आहे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याच वेळी प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही पुष्टी करतो की डीएमसीएच्या नोटीसनंतर माननीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे खाते तात्पुरते ब्लॉक केले गेले होते. ज्या ट्वीटमुळे हे झालं ते ट्वीटही काढून टाकले गेले आहे. आमच्या पॉलिसीनुसार, कोणत्याही सामग्रीच्या कॉपीराईटबाबत मालक किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून वैध तक्रार प्राप्त झाल्यावर त्यावर कारवाई केली जाते. 

माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक

एआर रहमान यांच्या गाण्यावर कॉपीराईट क्लेम

ट्विटरने 'डीएमसीए नोटीस टू ट्विटर' अशा शीर्षकाने उत्तर दिलं आहे. यात ट्विटरने म्हटले आहे की, या ट्वीटवर सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनीने कॉपीराईट क्लेम केला आहे. त्यांनी सांगितले की ट्वीटमध्ये दिलेल्या क्लिपमध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांचे प्रसिद्ध गाणे 'माँ तुझे सलाम' वापरण्यात आले आहे. ज्यानंतर या ट्वीटवर म्युझिक कंपनीने कॉपीराइटचा क्लेम केला होता. आमच्या कॉपीराइट पॉलिसी अंतर्गत ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या खात्यावर तात्पुरती एक तासासाठी बंदी घातली होती.

रविशंकर प्रसाद यांनी काय म्हटलं होतं?

रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं की, कोणत्याही प्लॅटफॉर्मला आयटीसंदर्भात नवीन कायदा पाळावाच लागेल. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ट्विटरच्या या कृतीतून हे स्पष्ट झाले आहे की ते बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नाही, तर त्यांचा अजेंडा चालवण्यातच त्यांना रस आहे. ट्विटरची कारवाई आयटीच्या नियमांविरूद्ध आहे. खाते ब्लॉक करण्यापूर्वी ट्विटरने मला कोणतीही सूचना दिली नाही. हे सिद्ध करते की ट्विटरला नवीन नियम पाळायचे नाहीत. ट्विटरने नवीन नियमांचे पालन केले असते तर त्यांनी कोणाचेही खाते मनमानीपूर्वक लॉक केले नसते, असं रविशंकर प्रसाद यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.