नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपलं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे. "अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन" असल्याच्या कथित कारणावरून सुमारे एक तास अकाऊंट बंद करण्यात आले होते. रविशंकर प्रसाद यांनी स्वदेशी कू अॅपवर याबाबत निवेदन काढून या कारवाईचा निषेध केला आहे.
मंत्री म्हणाले की ट्विटरच्या या कृतीने माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code), 2020 च्या नियम 4 चे उल्लंघन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे.
रवी शंकर प्रसाद म्हणाले की, कोणत्याही प्लॅटफॉर्मला आयटीसंदर्भात नवीन कायदा पाळावाच लागेल. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ट्विटरच्या या कृतीतून हे स्पष्ट झाले आहे की ते बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने नाही, तर त्यांचा अजेंडा चालवण्यातच त्यांना रस आहे.
ट्विटरची कारवाई आयटीच्या नियमांविरूद्ध आहे. खाते ब्लॉक करण्यापूर्वी ट्विटरने मला कोणतीही सूचना दिली नाही. हे सिद्ध करते की ट्विटरला नवीन नियम पाळायचे नाहीत. ट्विटरने नवीन नियमांचे पालन केले असते तर त्यांनी कोणाचेही खाते मनमानीपूर्वक लॉक केले नसते, असं रविशंकर प्रसाद यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.
ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात बराच काळपासून वाद सुरू आहे. ट्विटरला नवीन नियम पाळावा लागेल असे सरकारचे म्हणणे आहे. नवीन नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल. यामध्ये मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि भारतात तक्रार अधिकारी यांची नेमणूक इ. गोष्टींचा समावेश आहे.