मंबई: हे वर्ष जगाच्या आणि भारताच्या दृष्टीनं अभूतपूर्वच म्हणावं लागेल. कोरोनाच्या संक्रमणानं सगळ्या जगाला प्रभावित केलं. आता यावरील लस कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या वर्षात आपण काय केलं किंवा आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडल्या याची नोंद प्रत्येकानं ठेवलीच असेल असं नाही. पण ट्विटरने याची नोंद ठेवलीय. ती #ThisHappened, #यहहुआ, #हेझाले अशा प्रकारच्या 11 भाषांत सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सोबत या वर्षी कोणत्या इमोजींचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे याचीही माहिती देण्यात आली आहे.
'आम्ही अजून नेमकं सांगू शकत की 2020 साली काय घडलं ...पण #हेझाले,' अशा प्रकारचं इंग्रजी आणि हिंदी भाषेतलं ट्वीट ट्विटरनं केलं आहे. ट्विटरचा हा डेटा 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर पर्यंतचा आहे. या नुसार दाक्षिणात्य अभिनेता विजयने 10 फेब्रुवारी 2020 रोजी एका कार्यक्रमात काढलेल्या सेल्फीला सर्वाधिक रीट्वीट करण्यात आलं आहे. त्याला 145.7 हजार रीट्वीट मिळाले आहेत.
या वर्षी विराट कोहलीच्या एका ट्वीटला सर्वाधिक लाईक्स मिळाल्या आहेत. विराट कोहलीने 27 ऑगस्ट 2020 रोजी एक ट्वीट करुन त्याची पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचं आणि जानेवारी 2021 मध्ये नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच सांगितलं होत. सोबत त्याचा आणि अनुष्काचा फोटोही शेअर केला होता. या ट्वीटला 642.7 हजार लाईक्स मिळाल्या आहेत.
अमिताभ बच्चनने केलेलं एक ट्वीट यावर्षीचं सर्वाधिक कोट करण्यात आलेले ट्विट ठरलंय. अमिताभने 11 जुलैला एक ट्वीट करुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. या ट्वीटला 43.6 हजार कोट करण्यात आले होते.
सोबतच ट्विटरने या वर्षी सर्वाधिक वापरण्यात आलेले इमोजी कोणते आहेत त्याचीही माहिती दिली आहे. हसताना डोळ्यातून पाणी येणाऱ्या इमोजीचा या वर्षी सर्वाधिक वापर करण्यात आलाय. त्यावर गमतीनं ट्विटर आपल्या युजर्सना म्हणतंय की, "यावर्षी हसून-हसून तुमच्या डोळ्यात पाणी आलंय." त्यानंतर नमस्कार करणारे किंवा प्रार्थना करणाऱ्या इमोजीचा वापर करण्यात आलाय. त्यावर ट्विटरचं मत आहे की युजर्सनी यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली.
त्यानंतर हर्ट शेपच्या डोळ्यांचा हसणारा चेहरा असलेल्या इमोजीचा वापर करण्यात आलाय. त्यावर यावर्षी युजर्सनी मोठ्या प्रमाणावर प्रेम व्यक्त केल्याची भावना ट्विटरने व्यक्त केली आहे. 'थम्स अप' च्या इमोजीवर ट्विटर म्हणतंय की, "जीवनात अनेक वाईट गोष्टी घडत असताना तुम्ही धाडसानं थम्स अप करुन प्रामाणिकपणा दाखवला."
या वर्षी युजर्सनी रडणाऱ्या इमोजीचा पाच नंबरला वापर केला. त्यावर ट्विटर गमतीनं म्हणतंय की, "आम्ही रडलो नाही, तुम्ही मोठ्यानं रडलात."
सोबतच कोणत्या खेळांमध्ये सर्वाधिक हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे याचीही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक #IPL2020 या हॅशटॅगचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर #WhistlePodu आणि #TeamIndia हे हॅशटॅग वापरण्यात आलेत.
चित्रपटांतही सर्वाधिक हॅशटॅग वापरण्यात आलेल्या चित्रपटांचीही यादी ट्विटरने दिली आहे. यात #DilBechara या हॅशटॅगचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे. त्यानंतर #SooraraiPottru आणि #SarileruNeekevvaru हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.
भारतात 'बिनोद' या नावाने मिम्स व्हायरल होत असताना मुंबई पोलीसांनी ऑनलाईन पासवर्डबद्दल जागरुकता करताना एक मजेशीर ट्वीट केलं होत. त्यात त्यांनी सांगितलं होतं की, "बिनोद, तुझं नाव व्हायरल होत आहे. त्यामुळे तुझ्या पासवर्डचे नाव बिनोद नसावे अशी आम्ही आशा करतो. तसं असेल तर ते बदल." मुंबई पोलीसांच्या या ट्वीटला रीट्वीट करताना ट्विटरने सांगितले की, "बिनोद नावाने भारतात या वर्षी सर्वाधिक मिम्स तयार करण्यात आले आहेत."
महत्वाच्या बातम्या: