मुंबई : ट्विटरने सक्रिय नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास तीन लाख फॉलोअर्स कमी झाले, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार ट्विटर फॉलोअर्स कमी झाले.


सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, अशी घोषणा ट्विटरने मागील आठवड्यात केली. यामुळे भारतासह जगभरातील सेलिब्रेटिंना आपले फॉलोअर्स गमवावे लागले.

नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या चार कोटी 34 लाखांहून कमी होऊन आता चार कोटी 31 लाखांवर आली आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्याही एक लाख 40 हजारांनी कमी झाली आहे.

‘आमच्या या निर्णयामुळे काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण आम्ही पारदर्शितेवर विश्वास ठेवतो, ज्यातून ट्विटर ही अधिक संवादभिमुख सेवा होऊ शकेल,’ असं ट्विटरचे सुरक्षा प्रमुख विजय गडे यांनी म्हटलं आहे.

ट्विटरच्या या स्वच्छता अभियनाचा फटका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला आहे. ट्रम्प यांचे एक लाख फॉलोअर्स कमी झाले.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही तब्बल चार लाख फॉलोअर्स घटले आहेत.