Loksabha Election 2024 :  आगामी लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने यावेळी आपल्या रणनीतीत मोठा बदल केला आहे. भापने 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी ट्विटर बाईक प्लॅन केलाय. 
 
लोकसभा निवडणुकीआधी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये महत्त्वाची आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपने जवळपास क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर भापने आता 2024 च्या लोकसभेसाठी कंबर कसलीय. 


केंद्रात मोदी सरकार आल्यापासून डिजिटल तंत्रज्ञानाने भारतातील प्रत्येक क्षेत्रात प्रभाव टाकला आहे. सध्या देशातील अनेक लाकांकडे मोबाईल असून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ-मोठी मार्केटिंग कॅम्पेन चालवली जात आहेत. कोणतीही माहिती आता क्षणार्धात लाखो लोकांच्या मोबाईलवर पोहोचत आहे. भाजपच्या रणनीतीकारांनी यावेळी सोशल मीडियाला निवडणुकीचे अस्त्र बनवण्याचे ठरवले आहे. भाजपच्या योजनेनुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक ट्विटर हँडल तयार केले जाईल आणि त्या भागातून 50,000 फॉलोअर्स जोडले जातील. ट्विटरवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी  संघ महाविद्यालयीन मुली, बचत गट, धार्मिक नेत्यांच्या माध्यमातून संपर्क साधतील. 


या ट्विटर हँडलद्वारे केंद्राच्या 12 योजनांच्या लाभार्थ्यांना जोडण्याची योजना आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक सोशल मीडिया टीम, एक लोकसभा समन्वयक, सोशल मीडिया समन्वयक आणि एक पूर्ण टाइमर तैनात केला जाणार आहे.


आता 144 नंतर आता नवा 160 चा प्लॅन
 भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या 144 जागांवर अगदी कमी फरकाने जय-पराजय झाला होता त्या जांगांवर लक्ष केंद्रीत केले होते. तो वाढवून आता 160 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.


 गेल्या वर्षी 25 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली होती.  त्यामध्ये लोकसभेच्या स्थलांतर योजनेवर चर्चा झाली. यामध्ये संसदीय मतदारसंघांचा एक क्लस्टर तयार करण्यात आला. ज्यांचे प्रभारी मोदी सरकारमधील मंत्री किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असतील. हे सर्व प्रभारी संघटना मजबूत करण्याचे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम करतील. याशिवाय हे सर्व नेते बूथ स्तरावरील उपक्रमांपासून ते स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेत्यांशी संपर्क साधतील.  


 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 436 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 303 जागा जिंकल्या होत्या. सुरुवातीच्या योजनेत अशा 144 जागांचा समावेश करण्यात आला होता, ज्या ठिकाणी कमी फरकाने जय-पराजय झाला होता. त्याची संख्या आता 160 केली आहे.   


भाजपने लक्ष्य केलेल्या 160 जागांपैकी पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. यासोबतच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जागांचाही या राज्यांमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीसह या यादीत पक्षाने 16 जागांचा समावेश केला आहे. याशिवाय बंगालमधील 19 जागा आणि गांधी घराण्याचा बालेकिल्ला असेल्या उत्तर प्रदेशातील रायबरेली, बसपचा बालेकिल्ला आंबेडकरनगर, श्रावस्ती जेथे भाजपचा बसपकडून अल्प फरकाने पराभव झाला होता. भाजपकडून तयार करण्यात आलेल्या विविध समित्या स्थानिक संस्कृती, सण-उत्सव, राजकीय कार्यक्रम आणि बाईक चालवणाऱ्या तरुणांचा तपशीलही गोळा करणार आहेत.


या मंत्री आणि नेत्यांवर क्लस्टर हेडची जबाबदारी 
पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, नरेंद्र सिंह तोमर, गिरीराज सिंह, मनसुख मांडविया, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, संजीव बल्यान, जितेंद्र सिंह, महेंद्र नाथ पांडे यांना क्लस्टर हेड आणि याशिवाय अनेक नेत्यांना संसदीय मतदारसंघाचे प्रभारी बनवले आहे.