Joshimath News:  कुठे रस्त्यांवर भेगा पडल्यात..तर कुठे घरांच्या भिंतींना तडे गेलेत..कुठे घरं पडतायेत..तर कुठे भिंतींमधून पाण्याचा प्रवाह सुरु झालाय...हे कुठल्या चित्रपटातील दृष्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshimath) शहरातील स्थिती आहे. जोशीमठ शहरातील नागरिक भयाच्या सावलीत वावरत आहेत. या शहरातील घरं, डोंगराचा भाग खचू लागला आहे. तर, जमिनींनादेखील मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या विकासकामांचा हा परिणाम असल्याचा आरोप सामाजिक कायकर्ते, पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे. 


जोशीमठ शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शहरातील नागरीक जीव मुठीत धरून राहत आहेत. अनेकजण थंडीच्या दिवसात उघड्या मैदानावर रात्र काढत आहेत. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे उत्तराखंड सरकारकडून बैठका सुरू आहेत. शास्त्रज्ञांची पथके शहरात दाखल झाली आहेत. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते जोशीमठमध्ये जवळपास 90 टक्के घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. तर 40 टक्के घरे धोकादायक बनली आहेत. 


प्रशासनाच्या हालचाली सुरू 


उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. मारवाडी भागात सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसत आहे. येथील अनेक ठिकाणाहून जमिनीच्या आतून दूषित पाणी झिरपत आहे. जलविद्युत प्रकल्प वसाहतीच्या भिंतींना तडे गेले असून पाण्याचा प्रवाहदेखील वाढत आहे. 


अध्यात्मिक स्थळांनाही फटका


नागरिकांच्या घरासोबतच जोशीमठ शहरातील अध्यात्मिक, पौराणिक वास्तूंना फटका बसला आहे. आदिगुरू शंकराचार्यांच्या पौराणिक मंदिरालाही तडे गेले आहेत. ज्योतिर्मठ शिवालय हे अमर कल्पवृक्ष असल्याची श्रद्धा आहे. ज्योतिर्मठ हेच जोशीमठाचे अस्तित्व मानले जाते. हे मंदिर सुमारे अडीच हजार वर्षे जुने आहे. 2500 वर्ष जुना कल्पवृक्षही धोक्यात आला आहे. याच ठिकाणी जगतगुरु शंकराचार्य यांना दिव्य ज्ञान मिळाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. 


घरांना मोठे तडे


जेपी कंपनीच्या वसाहतीमधील अनेक घरांना तडे गेले आहेत. येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहे. जोशीमठमधील या भागातील जमिनींचे तडे दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याने लोकांची चिंता वाढत आहे.


नागरिकांचा सरकारविरोधात रोष 


जोशीमठमधील नागरिकांमध्ये सरकारविरोधात रोष वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी रात्री मशाल मोर्चा काढत सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. एनटीपीसीकडून सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर, सरकारकडून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली जात असल्याचा दावा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केला. या घटनेचे नेमकं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ, शास्त्रज्ञांचे पथक जोशीमठमध्ये दाखल झाले आहे.