नवी दिल्लीः दहावीच्या परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, असा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहचलं आहे.


 

मात्र एबीपीने केलेल्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं आहं. सरकारने अशी कोणतीही योजना आणली नसून कोणतीही शिष्यवृत्ती उपलब्ध नाही, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

 

 

काय आहे मॅसेज?

दहावी आणि बारावीच्या निकालाची जून महिन्यात सर्वात जास्त चर्चा होती. एकदाचा निकाल लागला आणि पुन्हा एका नवीनच मेसेजची चर्चा सुरु झाली. हा मेसेज फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सध्या व्हायरल होत आहे.

 

 

सर्व पालकांसाठी सुचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला दहा हजार रुपये आणि बारावी परीक्षेत 85 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असं या मेसेजमध्ये लिहीलं आहे.

 

 

मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे, ज्याद्वारे या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र ही लिंक उघडताच निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाचं पेज येत आहे.

 

 

एबीपीने या मेसेजच्या पडताळणीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर सरकारची अशी कोणतीही शिष्यवृत्ती योजना नाही, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रवक्ता घनशाम गोयल यांनी सांगितलं.