कोची : शबरीमला मंदिराच्या प्रकरणावरुन केरळमध्ये तणाव वाढत आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज केरळमध्ये दाखल होणार होत्या. त्यानुसार त्या पहाटे कोची विमानतळावर पोहचल्या. परंतु आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू दिले नाही. देसाई यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. परंतु आंदोलकांनी देसाई यांना विमानतळाबाहेर पडू दिले नाही.

उद्या (17 नोव्हेंबर) तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करणार आहेत. यावेळी मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. परंतु अयप्पा धर्म सेनेचे राहुल ईश्वर यांनी तृप्त देसाई यांना मंदिरात न येण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, "आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करु परंतु कोणत्याही परिस्थितीत देसाई यांना मंदिरात प्रवेश करु देणार नाही".


तृप्ती देसाई यांनी सांगितले की,"सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर 16 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शबरीमला मंदिरात प्रवेश करेन". भूमाता ब्रिगेडने त्यासंदर्भात मुख्यमंत्री विजयन यांना पत्र लिहिले आहे. देसाई यांनी पत्रात नमूद केले आहे की, केरळमध्ये प्रवेश करण्यापासून ते परत घरी जाईपर्यंत मला सुरक्षा प्रदान करण्यात यावी. याआधी अनेक महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षा न मिळाल्यामुळे त्या महिला मंदिरात प्रेश करु शकल्या नाहीत.