लखनौ : नणंदेच्या नवऱ्यासोबत असलेले अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने विवाहितेने पोटच्या मुलाची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांच्या चिमुरड्याने आरोपी मातेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यातील धनघटामध्ये ही घटना घडली.


सहा वर्षांच्या आदर्श पासवानचा मृतदेह यूपीतील धनघटामध्ये असलेल्या एका नदीजवळ मिळाला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केला. आदर्शची सख्खी आई कविता पासवानने प्रियकर राकेश पासवानच्या मदतीने पोटच्या मुलाचा काटा काढल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

आदर्शचे वडील राजीव मुंबईत नोकरी करतात. गावात त्यांची पत्नी कविता, मुलगा आदर्श, मुलगी, दोन बहिणी, एका बहिणीचा नवरा राकेश पासवान आणि आई राहतात. राकेशचं अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालं. राकेश आपल्या सासरी राहून आयुर्वेदिक औषधं विकण्याचं काम करत होता. तिथेच त्याचे कविताशी अनैतिक संबंध जुळले.

आदर्शने आईला राकेशसोबत पाहिलं होतं. मुलगा ही गोष्ट त्याच्या वडिलांना सांगेल, या भीतीने तिने त्याची हत्या करण्याचा कट रचला. गावातल्या एका मुलासोबत तिने आदर्शला राकेशकडे पाठवलं. राकेश त्याला बाईकवर बसवून फिरायला घेऊन गेला. त्यानंतर आदर्शची गळा दाबून हत्या करत त्याने मृतदेह नदी किनारी फेकला.