KCR National Party Launch : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samiti) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आज विजयादशमीचा मुहूर्त साधत आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. केसीआर हे केंद्रात भाजपसमोर एक मजबूत विरोधक उभे करण्यासाठी अनेक दिवसांपासून नियोजन करत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर ते 'भारतीय राष्ट्र समिती' या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. यानंतर वर्षअखेरीस राजधानी दिल्लीत जाहीर सभा घेण्याचा प्लॅन त्यांनी तयार केला आहे. अलीकडेच केसीआर यांनी बिहार, कर्नाटकसह अनेक राज्यांना भेटी दिल्या आणि मुख्यमंत्र्यांसह मोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली होती.
हैदराबाद येथील पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला TRS नेते, मंत्री, खासदार, आमदार, MLC आणि जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित राहणार आहेत. तेलंगणा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार बी विनोद कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री टीआरएसचे नाव बदलून भारतीय राष्ट्र समिती (BRS) करण्याची घोषणा करतील.
केसीआर यांचा नेमका प्लॅन आहे तरी काय? जाणून घेऊया 10 मुद्यांमधून
- नव्या राष्ट्रीय पक्षाच्या शुभारंभासाठी आज दुपारी 1:19 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राव तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती ठेवू शकतात, असे बोलले जात आहे.
- रविवारी, केसीआर म्हणून ओळखल्या जाणार्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाच्या सर्व 33 जिल्हाध्यक्षांसह लंचचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय पक्षाच्या शुभारंभाच्या रोडमॅपवर चर्चा झाली.
- लवकरच एक राष्ट्रीय पक्ष स्थापन केला जाईल आणि त्याची धोरणे तयार केली जातील, असा केसीआर यांनी अनेकवेळा विविध मंचांवर पुनरुच्चार केला होता. आता त्यांची थेट लढत भाजपशी आहे.
- चंद्रशेखर राव यांच्या पक्षांतर्गत लढवली जाणारी पहिली निवडणूक बहुधा मुनुगोडे पोटनिवडणूक असेल, जी 4 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. पक्ष गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.
- केसीआर 9 डिसेंबर रोजी दिल्लीत मोठ्या रॅलीची योजना आखत आहेत. याला पाठिंबा देणाऱ्या संघटना आणि नेत्यांच्या उपस्थितीत बीआरएस अधिकृतपणे सुरू होईल.
देशभरात फिरण्यासाठी मुख्यमंत्री 12 आसनी विमानाचा वापर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. - केसीआर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते की भारत राष्ट्र समिती (BRS) राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पर्याय म्हणून उदयास येईल आणि 2024 मध्ये या दोघांमध्ये थेट लढत होईल. पक्षाला निवडणूक चिन्ह अॅम्बेसेडर कार आणि त्याचा गुलाबी रंग कायम ठेवायचा आहे.
- आज तेलंगणा भवन येथे TRS विधिमंडळ पक्ष आणि राज्य कार्यकारिणीची विस्तारित बैठक होणार आहे, ज्यामध्ये TRS राष्ट्रीय पक्ष बनण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जाईल. टीआरएसचे नाव बदलण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.
- केसीआर यांच्या राष्ट्रीय योजनांची खिल्ली उडवताना पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, पक्ष येणे आणि गायब होणे यात काही नवीन नाही.
- भाजप तेलंगणाचे प्रवक्ते एनव्ही सुभाष म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणे ही केसीआर यांची केवळ आपल्या सरकारच्या अपयश झाकण्यासाठी खेळी आहे. ते म्हणाले की, नव्या पक्षासाठी 12 आसनी विमान 100 कोटींना विकत घेण्यात आले. जनतेचा पैसा कसा लुटला गेला, भाजप हे सहन करणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या