अगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने नवा वाद ओढावून घेतला आहे. यावेळी त्यांनी तरुणांना सरकारी नोकरी आणि राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा स्वत:ची पान टपरी सुरु करा, असा अजब सल्ला दिला आहे.

शनिवारी त्रिपुरातील प्रज्ञा भवनमध्ये त्रिपुरा वेटेरनरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुख्यमंत्री विप्लब देव राज्यातील तरुणांना संबोधित करत होते.

यावेळी त्यांनी तरुणांनी राजकारणी आणि सरकारी नोकरींच्या मागे लागण्यापेक्षा, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन, पशुसंवर्धन क्षेत्रासह विविध विभागात काम सुरु करुन, स्वावलंबी बनण्याचा, सल्ला दिला.

विप्लब देव म्हणाले की, "देशातले तरुण शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीसाठी राजकरण्यांच्या मागे अनेक वर्ष फिरत असतात. वास्तविक, असं करुन ते आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वाया घालवतात. पण याच तरुणांनी सरकारी नोकरी आणि राजकारण्यांच्या मागे लागण्यापेक्षा स्वत:ची पानाची टपरी सुरु केली असती, तर त्यांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच लाख रुपये जमा झाले असते."

दरम्यान, विप्लब देव यांनी यापूर्वीही आपल्या वक्तव्याने वाद ओढावून घेतला होता. शनिवारी एका त्रिपुराची राजधानी अगरताळामध्ये एका कार्यक्रमात मॅकेनिकल किंवा इंजिनिंअरिंग करणाऱ्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये न येण्याचा सल्ला दिला होता.

तर गुरुवारी एका सौंदर्य स्पर्धेतही त्यांनी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री डायना हेडनवरुनही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'ऐश्वर्या राय ही डायना हेडनपेक्षा सुंदर आहे. आणि तिची विश्व सुंदरी म्हणून निवड होणे योग्य असल्याचं,' वक्तव्य विप्लब देव यांनी या कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर चोहूबाजूंनी टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी यावर माफी मागितली.