नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी मंजूर झालेलं ट्रिपल तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं. मात्र तिहेरी तलाक विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं.

आज राज्यसभेत हे विधेयक मांडताच काँग्रेसनं या विधेयकातील अनेक तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला, तर इतर विरोधी पक्षांनीही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला. विरोधकांनी या विधेयकाला स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

काही जण विनाकारण विरोधाच्या नावाखाली या विधेयकाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गदारोळानंतर राज्यसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.