नवी दिल्ली : तिहेरी तलाक हा इस्लामचा मूलभूत आणि अविभाज्य भाग नाही. त्यामुळे तिहेरी तलाक संपुष्टात आणल्यास इस्लामचा पाया डगमगेल, असं म्हणणं निरर्थक आहे, असं नमूद करत केंद्र सरकारनं आज पुन्हा एकदा तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आणण्याची  मागणी केली.


गेल्या गुरुवारपासून सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकवर सुनावणी सुरु असून, आज या सुनावणीचा पाचवा दिवस होता. या सुनावणीवेळी केंद्र सरकारची बाजू पुन्हा स्पष्ट करताना महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी हिंदू धर्मातील सती, देवदासी यांसारख्या अनिष्ठ प्रथा कायदा करून संपुष्टात आणण्यात आल्याचा दाखला दिला.

विशेष म्हणजे, या सुनावणीवेळी न्यायालयाने महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना केंद्र सरकार यासाठी कायदा का करत नाही? असा प्रश्न केला. त्यावर मुकुल रोहतगी यांनी आम्ही यासाठी तयार असल्याचा पुनरुच्चार केला.

सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणीवेळी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्ट जर ही प्रथा संपुष्टात आणणार असेल, तर त्यावर केंद्र सरकार कायदा करेल, असं स्पष्ट केलं होतं. तसेच या सुनावणीत घटनेच्या कलम 14, 15 (समानतेचा कायदा) चा विचार केला पाहजे, असं मतही न्यायालया समोर मांडलं होतं.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टानं कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं मांडली. तसेच यावेळी सिब्बल यांनी रामजन्म आणि गोरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र कोर्टानं राजनैतिक मुद्यांवर भाष्य न करण्याचं आवाहन करत, फक्त तिहेरी तलाकवर युक्तीवाद करण्याच्या सूचना दिल्या.

सध्या सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाक प्रकारणावर दैनंदिन सुनावणी सुरु असून, यावरील दोन्ही पक्षाच्या बाजू मांडल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी बाजू मांडत आहेत. तर मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने वरिष्ठ वकिल कपिल सिब्बल भूमिका मांडत आहेत. या आठवड्याच्या अखेरीस तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

तिहेरी तलाक घटनाबाह्य कसा? कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद


… तर तिहेरी तलाकसाठी केंद्र सरकार कायदा करेल!


BLOG: ‘तोंडी तलाक’ला आता न्यायाची प्रतिक्षा


‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वात वाईट, सुप्रीम कोर्टाचं परखड मत


ट्रिपल तलाकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार


कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!


‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा


तीन तलाक वैध की अवैध?, सुप्रीम कोर्टात सुनावणीला वेग



चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक…तलाक…तलाक…


मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट