नवी दिल्ली : मुस्लिम धर्मियांमधील ट्रिपल तलाक पद्धतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्यामुळे ट्रिपल तलाक पद्धतीवर काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं आहे.

 
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नुसार तीन वेळा तलाक म्हटल्यानंतर महिलेला घटस्फोट दिला जातो. या प्रकाराला मुस्लिम धर्मियातील काही महिलांनी विरोध केला आहे. या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनाही मुस्लिम महिलांनी पत्र लिहिलंय. त्यानंतर राहटकर यांनी मोदींची वेळ मागितलीय.

 

 

तलाक, पुनर्विवाह प्रथांविरोधात मुस्लिम महिलांचा एल्गार


 
तलाक शब्द उच्चारुन घटस्फोट आणि पुनर्विवाहाची हलाल पद्धत मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असून, त्यात बदल करावा असं या निवेदनात म्हटलं आहे. या निवेदनावर 1100 महिलांच्या सह्या आहेत. देशातील 13 राज्यांमधील महिला आयोगांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे असंच निवेदन मुस्लिम महिलांनी दिलं आहे.

 

 

एमआयएमची टीका :


 
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी विजया राहटकरांसह भाजपवर टीकास्त्र सोडलंय. मुस्लिम धर्मियांच्या गोष्टीत हस्तक्षेप करण्याआधी औरंगाबादमधील मदरशांमध्ये येऊन मुस्लिम धर्मियांचा अभ्यास करा असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांना दिलाय.