35th Garden Tourism Festival : रंगीबेरंगी फुलांची आरास करुन तयार केलेले प्राणी-पक्षी पाहायचे असतील तर तुम्हाला गार्डन टुरिझम फेस्टिव्हलला (Garden Tourism Festival 2023) भेट द्यावी लागेल. दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांच्या हस्ते गार्डन ऑफ फाइव्ह सेन्स (The Garden of Five Senses) येथे दिल्ली सरकारतर्फे (Delhi Governmnet) आयोजित करण्यात येणाऱ्या 35व्या गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचे (35th Garden Tourism Festival) उद्घाटन करण्यात आलं. या बागेत जाऊन तुम्ही गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचा आनंदही घेऊ शकता. हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांनी वसंत ऋतुचे स्वागत करण्यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.


35वा गार्डन टुरिझम फेस्टिव्हल


दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या हस्ते उद्घाटन झालेला गार्डन टुरिझम फेस्टिव्हल रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. येथे तुम्हाला झेंडूच्या फुलांनी बनवलेला मोठा चित्ता, झेंडूपासून बनवलेला कुतुबमिनार, निळ्या ऑर्किडची आरास करुन बनवलेला मोर या सर्व फुलांपासून बनवलेल्या कलाकृती पाहायला मिळतील. या गार्डन फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला 300 हून अधिक प्रकारची फुले आणि झाडे, झुडुपे, बोन्साय आणि ट्रे गार्डन्स पाहायला मिळतील.






'गार्डन ऑफ युनिटी' या थीम


मागील 33 वर्षांपासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये दिल्ली सरकारकडून या महोत्सवाचे आयोजन केलं जातं. दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागाने यावर्षी G20 साठी गार्डन ऑफ फाइव्ह सेन्सेस 'गार्डन ऑफ युनिटी' या थीम असून त्यानुसार फेस्टिव्हलमधील सजावट करण्यात आली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या वर्षी पक्षी आणि प्राणी यांच्या विविध आकर्षक आकारात फुले आणि वनस्पतींची सजावट करण्यात आली आहे.


शेकडो प्रजातींच्या वनस्पती आणि फुलांचं प्रदर्शन


20 एकर परिसरात परसलेल्या या बागेत फुलं आणि पानांपासून तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. हिरवळीच्या परिसरात पसरलेली ही बाग शेकडो प्रजातींच्या वनस्पती आणि फुलांनी भरलेली असून हे दृश्यं फार सुंदर आणि विलोभनीय दिसत आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने साकेत मेट्रो स्टेशन ते 'गार्डन ऑफ 5 सेन्सेस' अशी मोफत शटल सेवाही सुरू केली आहे.


देशविदेशातील फुलं आणि झाडं आकर्षणाचं केंद्र


देशविदेशातील विविध फुलं आणि झाडं या फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेश आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या गार्डन टुरिझम फेस्टिव्हलमध्ये कॅनडातील मॅपल लीफ, फ्रान्सचे आयरीस, जर्मनीचे कॉर्नफ्लॉवर, तुर्कीचे ट्यूलिप, रशियाचे कॅमोमाईल, इटलीचे लिली ही फुलं आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. दिल्लीमधील हिरवळ वाढवणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सिसोदिया यांनी महोत्सवात पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला आणि भारत आणि परदेशातील विविध वनस्पतींचे प्रदर्शन करणाऱ्या स्टॉल्सना भेट दिली.