मुंबई : देशभरातील विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि देशविरोधी धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी हा संप करण्यात येत आहे. या बंदमध्ये देशातील दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसोबतच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा संघटनांनी केला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला भारतीय कामगार संघ या संपात सहभागी होणार नाही.


दरम्यान भारत बंद असला तरी राज्यातील शाळा-महाविद्यालयं सुरु राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली आहे. तसंच बंदला पाठिंबा द्यायचाच असेल तर शिक्षक, प्राध्यापकांनी काळ्या फिती लावाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. यानंतर प्राध्यापक-शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार आहेत.


काय आहेत मागण्या?
बेरोजगारी हटवण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत
किमान मजुरीचे दर निश्चित करावेत
कामगारांनी सामाजिक सुरक्षा मिळावी
कामगारांना 21,000 रुपये एवढं किमान मासिक वेतन मिळावं


बँक व्यवहार कोलमडण्याची शक्यता
या भारत बंदमध्ये बँक कर्माचारीही सहभागी होणार असल्यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. एटीएममधले पैसे संपेपर्यंतच ही सेवा सुरु राहिल. ज्या बँकेचे कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी होतील त्या ठिकाणी बँकेच्या कामांना विलंब लागू शकतो. तर काही बँका बुधवारी बंद राहू शकतात. बँक बंद असल्याने 8 आणि 9 जानेवारी या दोन दिवसांमध्ये एटीएममध्येही पैशांचा तुटवडा जाणवू शकतो. ऑनलाईन सुविधा मात्र सुरळीत चालू असतील.


...तर शिस्तभंगाची कारवाई
महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जर का या संपात सहभाग घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. महाराष्ट्र डीजीआयपीआरने याबाबत ट्वीट केलं आहे.





भाजीपाला आवकीवर परिणाम नाही
आज अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. आतापर्यंत 550 ते 600 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. दहा वाजेपर्यंत हीच आवक 700 गाड्यांवर जाण्याची शक्यता आहे. या बंद मध्ये माथाडी कामगार संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि एपीएमसी व्यापारी संघटनांचा सहभाग नसल्याने व्यावहार सुरळीत सुरु आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर, सांगली, परराज्यातून गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश इथून भाजीपाला आवक चांगली झाली असल्यामुळे दरही स्थिर राहिले आहेत.


या भारत बंदचा मुंबईच्या जनजीवनावर सध्यातरी कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत आहे. रेल्वे, रिक्षा, टॅक्सी व्यवस्थित सुरु आहे.