नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-भाजपमधली सर्वात मोठी बिग फाईट मंगळवारी पाहायला मिळणार आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भाजपनं लावलेल्या सापळ्यातून निसटून सलग पाचव्यांदा राज्यसभेवर पोहचणार का या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे.
शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाळीचा फायदा घेत भाजपनं काँग्रेसचे आत्तापर्यंत सहा आमदार फोडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 57 वरुन 51 वर पोहचली आहे. अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 45 मतांची गरज आहे. काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना गेल्या आठवडाभरापासून बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या आमदारांना सोमवारी गुजरातमध्ये आणलं गेलं.
आणंद इथल्या रिसॉर्टमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली असून इथून थेट मतदानालाच त्यांना आणलं जाईल.
दरम्यान जे सात आमदार रिसॉर्टमध्ये यायला तयार झाले नाहीत ते वाघेलांच्या कळपातले असल्यानं त्यांची मतं
अहमद पटेलांना मिळतील का याबद्दल शंका आहे. अशा परिस्थितीत अहमदभाईंची भिस्त ही पवारांच्या राष्ट्रवादीवरही असणार आहे.
राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये दोन आमदार आहेत, जेडीयूचा एक, तर गुजरात परिवर्तन पार्टीचा एक आमदार आहे. कुणाला मतदान करायचं याबद्दल आपल्या पक्षानं कुठला व्हिप काढला नसल्याचं वक्तव्य करुन काल प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेसचं टेन्शन वाढवलेलं होतं. पण आज दुपारी अहमद पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना, राष्ट्रवादीकडून आपल्यालाच बाजूनं मतदानसाठी व्हिप काढल्याचा संदेश मिळाल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्या नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपानं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपनं अहमद पटेलांची वाट बिकट करुन टाकली आहे.