नवी दिल्ली: नोटाबंदीनंतरचं आरबीआयचं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं जाणार आहे. यात व्याजदरात 0.25 ते अर्ध्या टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळातील हे दुसरे पतधोरण असेल.
कालपासून पतधोरण समितीची बैठक आरबीआयच्या मुख्यालयात सुरु आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या सदस्यांचाही सहभाग असल्यामुळे नोटाबंदीनंतरच्या या बैठकीत लोकाभिमुख निर्णयाची अपेक्षा आहे. त्यामुळं आज आरबीआयचे गव्हर्नर कोणते निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. जर रिझर्व्ह बँकेने आज आपल्या रेपो दरात 0.25 किंवा अर्धा टक्क्यांनी कपात केल्यास 6.25 वरुन थेट 6 टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी 5.75 टक्के होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एमपीसीची ही दुसरी बैठक असून पहिली बैठक ऑक्टोबरमध्ये झाली होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात करुन 6.25 टक्के केला होता.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली, तरी त्याचा थेट सर्वसामान्यांना कितपत फायदा होईल हा एक प्रश्न आहे. कारण, नोटाबंदीनंतर रिझर्व बँकेनं काही बँकांसाठी CRR 100 टक्के केला आहे. यामुळे बँकांकडील रोख जमा रकमेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बँकांकडील 3.25 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा झाली आहे.
बँकांच्या मते, CRR मध्ये कपात झाल्यास बँकांकडे पैसा आला, तरच सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या कर्जाच्या व्याजात मोठी कपात होईल. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँक CRR वरुन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.