मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


फायनलचा थरार... गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?'


आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम सामना पाहणार आहेत.


संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला 


भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला, असा आरोप संजय राऊतांनी केला. त्यानंतर आज संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला न्यू पॅलेसवर जाणार आहे. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदींची "मन की बात"


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम "मन की बात" द्वारे देशवासियांना संबोधित करतील. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 89 वा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन'की बात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात देशभरातील बारा सामाजिक कामं करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील केशव स्मृती संचालित मातोश्री आनंदाश्रम याचा समावेश असणार आहे. मातोश्री संस्था व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण


भंडारा जिल्ह्याच्या साकोली आणि लाखनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक 6 वर बांधण्यात आलेल्या ओवर ब्रिज तसेच गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.


चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन 


चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.राजेश मिरगे हे संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक  आहेत. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून वऱ्हाडी साहित्यिक शेगावात दाखल झाले आहे. दिवसभर वऱ्हाडी साहित्याची रेलचेल असणार आहे.


17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'


आजपासून 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला सुरूवात होणार  आहे. हा महोत्सव 29 मे ते 4 जून या कालावधीत होणार आहे.महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


आज इतिहासात


1905 : शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. 


1972 : हिंदी चित्रपटअभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.