नवी दिल्ली : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजनेची (आयडीएस) घोषणा केली होती. आज (30 सप्टेंबर) काळा पैसा जाहीर करण्यासाठी अंतिम दिवस आहे. यानंतर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अंतिम मुदत संपल्यानंतर तातडीने छापेमारी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, मात्र आयडीएसमध्ये उल्लेख केला नाही, अशा लोकांवर छापा मारला जाणार असून, यातील सर्व पैसा शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला आता अधिक गती दिली जाईल. त्यासाठी देशभरात इनव्हेस्टिगेशन विंगच्या रिक्त जागा प्राधान्याने भरल्या जातील. मात्र, सध्या भरतीद्वारे नियुक्ती शक्य नाही. मात्र, इतर विभागांमधील अधिकारी, निरीक्षक आणि इतर सपोर्टिंग स्टाफच्या मदतीने छापेमारीची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल.
आयडीएस योजनेनुसार लोक आपल्या अघोषित संपत्तीची माहिती देऊन कारवाईपासून वाचू शकतात. संपत्तीची माहिती ऑनलाईन किंवा व्यक्तिगत फॉर्मद्वारे देऊ शकतात. मात्र, जे अशाप्रकारे आपली बेहिशोबी संपत्ती जाहीर करतील, त्यांना 45 टक्के टॅक्स आणि दंड भरावं लागणार आहे. मात्र, दंड तीन हप्त्यात सप्टेंबर 2017 पर्यंत भरता येणार आहे. संपत्ती जाहीर करणाऱ्यांची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री आयकर विभागाने दिली आहे. या योजनेला किती प्रतिसाद मिळाला आहे, याबाबत केंद्र सरकारच्या पत्रकार परिषदेनंतरच कळू शकेल.