मुंबई : पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी कर्ज घोटाळ्यात पहिल्यांदाच नीरव मोदीने मौन सोडलं आहे. हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे पीएनबीने कर्ज वसुलीचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने पत्र लिहून म्हटलं आहे. देशातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने उलट्या बोंबा ठोकणं सुरु केलं आहे.


पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावाही नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला पत्र लिहिण्यात आलं. आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे.

'पीटीआय'ने नीरव मोदीच्या पत्राबाबत वृत्त दिलं आहे. ''चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,'' असं नीरव मोदीने म्हटलं आहे.

नीरव मोदी त्याच्या कुटुंबीयांसह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच देश सोडून पळाला होता. बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्याच्या घाईत माझ्या ब्रँडचा व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे आणि आता कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

''पत्नीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तरीही तिचं नाव यामध्ये चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आलं आहे. मामा मेहुल चोक्सीचं नावही तक्रारीत चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं आहे. कारण, त्याचा व्यवसाय वेगळा आहे आणि आमचा काहीही संबंध नाही. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,'' असाही दावा नीरव मोदीने केला आहे.

दरम्यान, 2200 कर्मचाऱ्यांचं वेतन सध्याच्या खात्यातून देण्याची परवानगी देण्यात यावी, असंही नीरव मोदीने पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी नीरव मोदीने बँकेला विनंती केली आहे.

अकरा हजार कोटींचा घोटाळा कसा झाला?

नीरव मोदी आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे षडयंत्र रचलं. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. हेच पत्र हाँगकाँगमधल्या अलाहाबाद आणि अॅक्सिस बँकेच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे जे सामान मागवण्यात येत आहे, त्याचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत आहे.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केले आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

मात्र बँक अधिकाऱ्यांनी जेवढे पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तेवढी कॅश भरायला सांगितली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीने एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

नीरव मोदी कोण आहे?

नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे, ज्याला भारतातील 'डायमंड किंग' असंही म्हटलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

नीरव मोदीची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने आपल्याच नावाने म्हणजे नीरव मोदी डायमंड ब्रँड नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीचे 25 लग्झरी स्टोअर आहेत.

नीरव मोदीच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदीच्या डायमंड ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदीच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदीने सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

संबंधित बातम्या :

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल