Congress Satyagraha Against Agnipath Scheme: केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलन होत असल्याचे चित्र दिसत आहे. अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण जवळपास 13 राज्यात पसरलं आहे. बिहारसह, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यात आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस आज दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलन करणार आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे. सशस्त्र दलात भरतीसाठी सुरु करण्यात आलेल्या 'अग्निपथ' योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांची एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस खासदार आणि नेते जंतर मंतरवर 'सत्याग्रह' करणार आहेत.
दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरे आणि शहरांमधून हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आलं आहे. 19 जून रोजी सकाळी 11 वाजता जंतर मंतर इथं सुरु होणाऱ्या 'सत्याग्रहा'मध्ये काँग्रेसचे खासदार, त्यांच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अग्निपथ योजनेमुळं आपल्या देशातील तरुण संतप्त झाले आहेत. ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणं ही आपली जबाबदारी आहे. देशभरातील नेते अग्निपथ योजनेच्या विरोधात सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.
राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन या योजनेवर टीका केली होती. आठ वर्षांपासून भाजप सरकारनं 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान केला आहे. पंतप्रधानांना कृषी कायदा मागे घ्यावे लागतील असे मी पूर्वी म्हटले होते. त्यानंतर ते कृषी कायदे मागे घेतले. आता अग्निपथ योजना देखील सरकारला परत मागे घ्यावी लागले असे गांधी म्हणाले होते.
प्रियांका गांधींचा निशाणा
प्रियंका गांधी यांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या, असे त्यांनी म्हटलं आहे. तीन वर्षांपासून नोकरभरती झाली नाही. तरुणांची निराशा झाली आहे. हवाई दलातील भरती आणि भरतीच्या निकालाची तरुणांना प्रतीक्षा आहे. सरकारनं त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, नोकरभरती बंद केल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- Agnipath Scheme Protest : बिहारमधील हिंसाचारामागे कोचिंग सेंटर', व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे भडकवले आंदोलन
- अग्निपथ योजनेविरुद्ध गदारोळ, केंद्र सरकारने भाजपच्या 12 नेत्यांच्या सुरक्षेत केली वाढ