Covid Cases Update Delhi-Maharashtra : भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्याने 13 हजारांचा टप्पा पार केलाय. देशातील रुग्णसंख्या वाढीमध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीचा मोठा वाटा असल्याचं दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीवरुन समोर आलेय. दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढ महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक आहे. देशाच्या 50 ते 60 टक्के रुग्ण या महाराष्ट्र आणि दिल्लीतील राज्यातील आहेत. शनिवारी माहराष्ट्रात तीन हजार 883 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीमध्ये 1,534  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट - 
Maharashtra Covid 19 Cases : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 3883 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत एकूण 2802 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,61,032 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.85 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एकूण 22,828 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13,613 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 4869 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. शनिवारी मुंबईत 2054 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 


दिल्लीत कोरोना वेगानं वाढतोय - 
New Delhi Covid 19 Cases : राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी एक हजार 534 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहचली आहे. मागील 24 तासांत दिल्लीत 1255 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  


गुजरातमध्ये 234 नव्या रुग्णांची नोंद -
शनिवारी गुजरातमध्ये 234 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 12,27,399 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गुजरातमध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू नाही. मागील 24 तासांत गुजरातमध्ये 159  रुग्णांनी कोरोनावर मात केली.  गुजरातमधील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 261 इतकी झाली आहे.