Tirupati Bus Accident : आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे शनिवारी रात्री भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात सात जण ठार तर 45 जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पोलीस अधिक्षक तिरुपती यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी लग्न समारंभासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.


अंधारामुळे बचावाकार्यात अडथळे
तिरुपतीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या चंद्रगिरी मंडलमधील बाकरपेटा भागात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत बचावकार्यात सुरु केले. काही वेळाने पोलीस आणि प्रशासनाच्या पथकासह बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार असल्याने बचावकार्यात अडचण निर्माण झाली. अशा स्थितीत रविवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले.






 


लग्न समारंभाला जात होते प्रवासी
बचाव पथकाने सात मृत आणि 45 जखमी लोकांना बाहेर काढले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बस एका लग्न समारंभासाठी जात होती. वाटेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस प्रथम खडकावर आदळली आणि त्यानंतर दरीत कोसळली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha