Regular International Flights : कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद होती. अखेर आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. 
नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्याची विमानतळ आणि विमान कंपन्यांनी पूर्ण तयारी केली आहे. भारतीय विमान कंपन्यांव्यतिरिक्त, एमिरेट्स आणि व्हर्जिन अटलांटिक सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरु करण्याबद्दल खूप उत्सुक आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (IGIA) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा आहे. 


गेल्या दोन वर्षापासून देशावर, राज्यावर कोरोनाचं संकट होत. हळूहळू कोरोनाचा धोका कमी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळं विमान वाहतूक प्रभावीत झाली होती. मात्र, आता विमान वाहतूक हळूहळू रुळावर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, परदेशी वाहकांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे. उन्हाळी वेळापत्रक 2022 हे यावर्षी 27 मार्च 2022 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत लागू आहे. मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, यूएसए, इराक यासह 40 देशांतील एकूण 60 परदेशी विमान कंपन्यांना उन्हाळी वेळापत्रक 2022 मध्ये भारतात 1 हजार 783 विमान उड्डाणे चालवण्यास मान्यता देण्यात आली आहे.


दरम्यान, भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली आहेत. कोविड महामारीच्या पहिल्या लाटेनंतर ही उड्डाण थांबवण्यात आली होती. कालांतराने हे निर्बंध वाढत गेले. मात्र, आता ही बंदी संपण्याची वेळ आली आहे. त्यामुळं आजपासून भारतातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमितपणे सुरु होणार आहेत.


कोरोनाच्या संकटातही काही देशांसोबत बायो-बबल व्यवस्थेअंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होती. मात्र, ती मर्यादित स्वरुपातील व्यवस्था होती. नागरी उड्डाण मंत्रालयाने 8 मार्च रोजी जाहीर केले होते की, 27 मार्च 2022 पासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होतील. यासोबतच कोविड प्रतिबंधाशी संबंधित तरतुदींमध्येही बदल करण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन इंडिगोचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विली बोल्टर यांनी शनिवारी एका निवेदनात सांगितले की, इंडिगो आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स प्री-कोविड स्तरावर नेण्यास उत्सुक आहे. परंतू, ते इतर देशांच्या आगमन नियमांवर देखील अवलंबून असेल. देशातील सर्वात मोठे विमानतळ IGIA चालवणाऱ्या DIAL ने आशा व्यक्त केली आहे की, येथून 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होतील.