लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपर्णा यादव यांच्या निमंत्रणानंतर कान्हा उपवनमध्ये जाऊन गोशाळा पाहिली. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या सूनबाई आहेत. यादरम्यान अपर्णा यादव यांना भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “आता काहीच सांगू शकत नाही. वेळ याचं उत्तर देईल.”
अपर्णा यादव म्हणाल्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीफसंदर्भातील माझ्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हापासून त्यांना माहितंय की, आम्ही गोशाळा चालवतो. शिवाय, योगी आदित्यनाथ यांच्याशी कायमच चर्चा होत असते, असे अपर्णा यादव यांनी यावेळी सांगितले.
भाजप प्रवेशावर अपर्णा यादव यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, वेळ याचं उत्तर देईल. विशेष म्हणजे, अपर्णा यादव यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचं खंडन केलं नाही.
लखनौमधील सरोजीनगर परिसरात गोशाळा असून, इथे अपर्णा यादव या ‘जीव आश्रय’ नावाची एनजीओ चालवतात. ही एनजीओ अपर्णा यादव गेल्या चार वर्षांपासून चालवत आहेत. तिथे एनजीओच्या मदतीने गाय, म्हशी आणि कुत्र्यांना सांभाळलं जातं.
गेल्या आठवड्यातच अपर्णा यादव या प्रतिक यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यादव यांच्यात काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यातच आहे. मात्र, राजकीय शिष्टाचारानुसार ही भेट झाल्याचे सांगण्यात आले होते.
अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लखनौ कँटमधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपर्णा यादव यांना भाजपच्या रीता बहुगुणा जोशी यांनी पराभूत केलं होतं.