Tiktok Layoffs : शॉर्ट व्हिडीओ ॲप (Short Video App) टिकटॉक (Tiktok) कंपनीकडूनही नोकरकपात (Layoff) करण्यात आली आहे. टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातील 40 कर्मचाऱ्यांना पिंक स्लीप (Pink Slip) म्हणजेच कामावरुन कमी केल्याची नोटीस दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टिकटॉक कंपनीने सोमवारी (6 फेब्रुवारी) कर्मचाऱ्यांना एक फोन केला त्यानंतर कामावरुन कमी केल्याची नोटीस पाठवली आहे.


दरम्यान, टिकटॉक कंपनीने सांगितलं आहे की, या कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे. ईटीच्या अहवालानुसार, टिकटॉक इंडियाच्या कर्मचाऱ्यांना 28 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असल्याची माहिती देण्यात आली होती. टिकटॉक कंपनी भारतातील संपूर्ण टीम बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.


टिकटॉकने फक्त भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं


भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 2020 सालीच Tiktok सह अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली. त्यानंतर टिकटॉक भारतात पुन्हा लाँच झालेलं नाही. टिकटॉक कंपनीने सांगितलं आहे की, भारतात टिकटॉक पुन्हा लाँच होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळेच कंपनी भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतात टिकटॉक ॲपवर जून 2020 पासूनच बंदी


देशाच्या सुरक्षेला धोका असल्याच्या कारणाने केंद्र सरकारने जून 2020 मध्ये टिकटॉकसह 300 चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या सीमावादापासून देशात चिनी ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिक्रिया टिकटॉकशी संबंधित होते. टिकटॉकसारखे ॲप देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे होते. त्यामुळे केंद्र सरकारने ॲप्सवर बंदी घातली.


येथे काम करत होते भारतीय कर्मचारी


चिनी ॲपवर भारतात बंदी घातल्यानंतर भारतातील बहुतांश कर्मचारी दुबई आणि ब्राझीलच्या बाजारपेठेत काम करत होते. भारतात टिकटॉकवर बंदी येण्याआधी 20 कोटींहून अधिक युजर्स होते. भारत ही टिकटॉक कंपनीची सर्वात मोठी परदेशी बाजारपेठ होती. पण भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी आणली. ही बंदी अद्यापही कायम आहे.


'या' कंपन्यांकडूनही नोकरकपात


आधीही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲमेझॉन (Amazon), मेटा (Meta), ट्विटर (Twitter), IBM, SAP, स्विगी (Swiggy) या कंपन्यांनीही अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जागतिक मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.