मध्यप्रदेश: कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कल्ला बावरिया अखेर मध्य प्रदेशच्या स्टेट टायगर स्ट्राइकच्या जाळ्यात अडकला आहे. अनेक दिवसांपासून तो गुंगारा देत होता. दहा वर्षापूर्वी मेळघाटासह अनेक राज्यात शिकार प्रकरणात त्याचा सहभाग राहिला आहे. 


कल्ला बावरिया हा 2013 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या शिकारीत सहभाग होता नंतर दहा वर्षेपासून तो फरार होता.. सोबतच अनेक राज्याच्या तस्करीत याचा सहभाग होता. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या कल्ला बावरीया अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशच्या विदीशा आणि सागर जिल्ह्यामध्ये लपून होता. कल्ला बावरीया हा भारताला लागून असलेल्या नेपाळ देशातसुद्धा वाघाची शिकार आणि अवयवांची तस्करी केल्याचा गुन्हा नोंदविला गेल्याने अनेक राज्याचे पोलीस, वन आणि व्याघ्र प्रकल्पचे पथक त्याच्या शोधात होते.


आदिनसिंह उर्फ बावारिया महाराष्ट्रासह तामिळनाडू, आसाम, मेघालयामध्ये वाघांची शिकार करण्यात सहभाग होता. वाघाची  कातडी, अवयव, हाडे  जप्त करण्यात आले आहे. तसेच  या अगोदर बावारिया टोळीच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आहे.  2013 साली  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झालेल्या शिकारीमध्ये कल्ला बावरियाचा सहभाग होता त्यानंतर दहा वर्षे तो फरार होता. याशिवाय गडचिरोली आणि ताडोबा येथील वाघांच्या शिकारीत देखील कल्ला बावरियाचा  सहभाग होता. 


मिळालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांचे पोलीस, वन विभाग आणि नेपाळ केंद्रीय अन्वेषण ब्युरो कल्ला बावरियाचा शोध घेत होते. या कारवाईमुळे केवळ मध्य प्रदेशातच नव्हे तर देशात वाघांचे संवर्धन आणि संरक्षण होईल. कल्ला बावरियाला वन विभाग कोठडीसाठी नर्मदापुरमच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. बव्हेरिया टोळीतील इतर सदस्य आणि गुन्हेगारीबाबत देशातील इतर राज्यांतून माहिती गोळा केली जात आहे. 


व्याघ्र प्रकल्प  शिकाऱ्यांच्या रडारवर


 चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट आणि गडचिरोली  व्याघ्र प्रकल्प  शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये एका वाघाची कातडी जप्त करण्यात आली होती आणि ही कातडी मध्यभारतातील वाघाची असल्याचा संशय आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रा सोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला देखील संशयित शिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात २०१२ च्या दरम्यान वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात या अलर्ट बाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.