भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभयारण्यात एका वाघाने वयस्कर वाघिणीलाच मारुन खाल्लं आहे. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. जंगलात वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.


मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यात असलेलं कान्हा पार्क वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. कान्हा नॅशनल पार्क हा व्याघ्र संरक्षित भाग असल्याने इथे वाघांची संख्या जास्त आहे.

"मृत जनावर एक वाघीण असावी, तर तिला मारुन खाणारा वाघ आहे. हा वर्चस्वाच्या लढाईचा परिणाम असू शकतो," असं कान्हा नॅशनल पार्कचे फील्ड डायरेक्टर के कृष्णमूर्ती यांनी सांगितलं.

मुंडीदादरमध्ये शनिवारी पेट्रोलिंग करणाऱ्या एका पथकाला एका वाघिणीचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आणि शरीरातील अर्धे अवयव गायब होते. "हे फारच विचित्र प्रकरण आहे. ज्या क्षेत्रात इतर शिकार असूनही एका वाघिणीला अशाप्रकारे मारुन खाण्याची घटना यापूर्वी कधीच पाहिली नव्हती," असं के कृष्णमूर्ती यांनी सांगितलं.

"शिकार करणाऱ्या वाघाने आपली भूक भागवण्यासाठी वाघिणीची शिकार केलेली नाही," असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. "हे वर्चस्वाच्या लढाईचं प्रकरण आहे. कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघांची संख्या चांगली आहे. त्यामुळे ही आपापसातील लढाई असू शकते," असंही जाणकार सांगतात.