भोपाळ : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा रंगली आहे. कारण करीनाला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळ मतदारसंघातून करीना कपूरला उतरवण्याची तयारी सुरु आहे.

मागील अनेक वर्षांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम कोणी नेता नाही तर अभिनेता करु शकतो, असं भोपाळमधील काही काँग्रेस नगरसेवकांचं म्हणणं आहे. त्यामुळे करीनाला उमेदवारी मिळावी, असा आग्रह या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे धरला आहे.

करीना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने भोपाळची जागा जिंकणं सोपं होईल, असं गणित गुड्डु चौव्हान आणि अनिस खान या नगरसेवकांनी मांडलं आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा नगरसेवकांनी केला आहे.



भोपाळच्या राजघराण्याची सून

करीना कपूर भोपाळमधील पतौडी या राजघराण्याची सून आहे. करीनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करीनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील नेत्यांना वाटतो. यासाठी लवकरच काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.

भाजपची टीका

काँग्रेसच्या नगरसेवकांच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार टीका केली आहे. काँगेसकडे नेता उरला नसल्याने त्यांना अभिनेत्यांची गरज पडत आहे, असा घणाघात भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र काँग्रेसकडून करीनाच्या नावाची चर्चा जरी होत असली तरी करीनाकडून उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

करीना कपूरचे सासरे नवाब पतौडी अली खान यांनी यापूर्वी भोपाळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता.