अहमदाबाद : गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल 26-27 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आसल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिकचं सुरतच्या किंजल पटेलसोबत सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये लग्नसोहळा पार पडणार असल्याची माहिती हार्दिकचे वडील भारतभाई पटेल आणि निकटवर्तीय निखील सवानी यांनी दिली.

किंजल पटेल ही मूळची अहमदाबाद जिल्ह्याच्या वीरमागामची राहिवासी आहे. मात्र सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत सुरतमध्ये राहते. तर हार्दिकचे मूळगावही विरमागाममधील चंदन नगरी हे आहे. लग्नाबाबत अजूनही हार्दिकने अधिकृत काहीही सांगितलेलं नाही. मात्र लग्नाची तयारी जोरात सुरु असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

50 ते 60 लोक उपस्थित राहणार 

हा लग्नसोहळा दोन दिवसांचा असणार आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांकडून 50 ते 60 लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. लग्न पारंपरिक आणि साध्या पद्धतीने होणार आहे. यापूर्वी हार्दिकच्या बहिणीच्या लग्नाच्या खर्चावरुन चांगलीच चर्चा झाली होती.

कोण आहे किंजल पटेल?

हार्दिक वयाच्या 25 व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. किंजल हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. किंजल परिख-पटेल असून तिने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन सध्या कायद्याचे शिक्षण घेत आहे.

उज्हा जिल्ह्यात प्रवेशबंदी

हार्दिकचं लग्न उज्हा जिल्ह्यातील उमिया धाममध्ये करण्याची कुटुंबीयाची इच्छा होती. कारण तेथील उमिया देवी ही पाटीदार समाजाची कुलदैवत आहे. मात्र कोर्टाने हार्दिकवर उज्हा जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे, अशी माहिती हार्दिकच्या वडिलांनी दिली.

हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली 2015 साली गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं हिंसक आंदोलन झालं होतं. त्यामुळे त्याला जेलमध्येही जावं लागलं. हार्दिक त्यावेळी फक्त 22 वर्षांचा होता. तेव्हापासून तो पाटीदार समाजाचा नेता म्हणून ओळखला जाऊ लागला.