बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या येडियुरप्पा यांनी प्रचारादरम्यान केलेलं विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे.'जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा' असं येडियुरप्पा भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.


'आता आराम करत बसू नका. तु्म्हाला वाटत असेल, की एखादा मतदार मतदान करत नाहीये, तर त्यांच्या घरी जा, त्यांचे हात-पाय बांधा, आणि त्यांना महांतेश दोड्डागुदर यांना मत देण्यासाठी घेऊन या' असा सल्ला येडियुरप्पांनी दिला.

महांतेश दोड्डागुदर हे कर्नाटकातील कित्तूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान बेळगावी जिल्ह्यात येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केलं.


कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. येडियुरप्पा मतदारांना धमकावत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे येडियुरप्पा यांना मोठ्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्यता आहे.