श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टमध्ये सुरक्षा रक्षकांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे तिन्ही दहशतवादी अल-कायदा या संघटनेचा विभागीय कमांडर झाकीर मुसा याच्या ग्रुपमधील होते.खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जाहीद आणि इसहाक अशी त्यांची नावं आहेत.


सुरक्षा जवानांना गुलाब बागमध्ये तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एसओजी आणि सीआरपीएफनं परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तीही पुलवामा जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्तानं येणार होत्या. मात्र ऐन वेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.

दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये सध्या लष्कराचं ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. त्यात त्यांनी दहशतवाद्यांची एक यादी बनवली आहे. यादीनुसार, दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवून 115 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

दरम्यान, या तिन्ही दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर मोठ्या जमावानं पोलिसांच्या कॅम्पवर दगडफेक केल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानासह दोन जणांना ठार करण्यात आलं होतं. पण यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता.