नवी दिल्ली : भारतात पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे मी अनेक गोष्टी करु शकतो, जिथे स्वातंत्र्य नाही, ती जागा मला आवडत नाही, अशा शब्दात भारताचं कौतुक करताना लामांनी चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.


'भारत आणि चीनला एकमेकांच्या शेजारी राहायचं असल्यामुळे हिंदी-चिनी भाई भाई या मंत्राशिवाय पर्याय नाही' अशा शब्दात तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांनी दोन्ही देशांना सबुरीनं वागण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. डोकलामचा प्रश्न तितकासा गंभीर नसल्याचंही ते म्हणाले.

भारत आणि चीन हे शेजारी देश असून त्यांना शेजारीच राहायचं आहे. त्यामुळे 'हिंदी-चिनी भाई भाई' शिवाय पर्याय नाही, असं दलाई लामांनी सांगितलं.

लहानशा तिबेटीयन समाजात पूर्णपणे लोकशाही असून लवकरच चिनी जनता आमची ही पद्धत स्वीकारेल असा विश्वास दलाई लामांनी बोलून दाखवला.