वाराणसी : गेल्या महिन्यात आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर संतप्त पडसाद उमटले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला आयआयटी बीएचयूमध्ये (IIT-BHU) एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी कॅम्पसमध्ये बॅनर, पोस्टर घेऊन निदर्शने करत होते.


वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.


आरोपी भाजप पदाधिकारी निघाल्याने खळबळ 


तिन्ही आरोपी पकडल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. तिन्ही आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे जवळचे असल्याचे समोर आले आहे. हे तीनही आरोपी भाजप आयटी सेलचे महानगर पदाधिकारी आहेत. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. कुणाल पांडे हा भाजप महानगर युनिटच्या आयटी सेलचा समन्वयक आहे, तर सक्षम पटेल सह-संयोजक आहे. आनंद चौहान हा कँट विधानसभा मतदारसंघातील आयटी सेल समन्वयक आहे.


काही दिवसांपूर्वी काशी प्रांत अध्यक्ष दिलीप सिंह पटेल यांच्याकडेही सक्षम पटेल पदाधिकारी म्हणून काम करत होता. याशिवाय कुणाल पांडे आयटी सेलच्या सदस्यांची नियुक्ती करत होता. कुणाल पांडे हा सराईसर्जन प्रभागातील भाजप नगरसेवकाचा जावई आहे. कुणाल पांडेचा विवाह सराईसर्जन प्रभागाचे नगरसेवक मदन मोहन तिवारी यांच्या मुलीशी गेल्यावर्षी झाला होता. 2022 मध्ये आनंद चौहानविरुद्ध भेलूपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.


लंका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल


या घटनेनंतर बीएचयूमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पोलिसही कामाला लागले. या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पस बंद ठेवला होता. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद झाले. संपूर्ण कॅम्पसची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणी लंका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. विद्यार्थिनीने दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, ती बुधवारी रात्री दीड वाजता वसतिगृहातून काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडली होती. कॅम्पसच्या गांधी स्मृती चौकाजवळ मित्र भेटला. आम्ही दोघे सोबत जात असताना वाटेत करमन बाबा मंदिरापासून 300 मीटर अंतरावर मागून एक बुलेट आली. त्यावर तीन मुले स्वार होती.


त्यांनी मला आणि माझ्या मित्राला दुचाकी उभी करून अडवून गैरवर्तन केल्याचे पीडितेने सांगितले. मी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाबाबत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या