1. दरवर्षी 26 जानेवारीला एका देशाचे राष्ट्रप्रमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यंदा पहिल्यांदाच एकाचवेळी 10 राष्ट्रांच्या प्रमुखांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. भारत-आसियान राष्ट्रांच्या संबंधाला 25 वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्तानं आसियानमधल्या थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस, ब्रुनोई या दहा देशांचे प्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी 100 फूट लांब बुलेटप्रुफ काच उभारली जाणार आहे.
2. राजपथावर डेअर डेव्हिल्सच्या बाईकवरच्या कसरती दरवर्षी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या असतात. यंदा पहिल्यांदाच बीएसएफच्या महिला जवानांचं पथक या बाईकवरच्या कसरती दाखवणार आहे. सीमा भवानी ( बाँर्डर ब्रेव्हज) असं या पथकाला नाव देण्यात आलं आहे. राँयल एनफिल्ड बुलेटवरुन दाखल होत 27 महिला जवानांचं पथक यंदा 16 प्रकारच्या चित्तथरारक कसरती दाखवणार आहे. ज्यात पिरॅमिड, फिश रायडिंग, शक्तिमान, बुल फायटिंग अशा फाँर्मेशनचा समावेश असणार आहे.
3. दरवर्षी राजपथावर ते ठुमकत, लचकत ऐटीत दाखल झाले की टाळ्यांचा सर्वाधिक पाऊस पडतो. बीएसएफच्या नखशिखान्त सजवलेल्या उंटांचं पथक याही वर्षी परेडचं मुख्य आकर्षण असणार आहे, त्यांच्यासोबत 51 घोडेस्वारांचं पथकही जोडण्यात आलं आहे.
4. राजपथावर जे सांस्कृतिक चित्ररथ सादर होतात, त्यात पहिल्यांदाच आँल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा चित्ररथ सादर होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चं प्रदर्शन यातून होणार आहे.
5. केंद्र सरकारच्या खात्यांचे जे विविध चित्ररथ सादर होत असतात, त्यात यावेळी पहिल्यांदाच आयकर विभागाचा चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे. नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात उचलेल्या अभियानांची माहिती या चित्ररथात दिली जाणार आहे.
6. परेडच्या शेवटी आकाशातून चित्तथरारक कसरती करत भारतीय हवाई दलाची विमानं राष्ट्रध्वजाला अनोखी मानवंदना देत असतात. याला फ्लाय पास्ट असं म्हणतात. मागच्या वर्षी 35 विमानं या फ्लाय पास्टमध्ये सहभागी होती. यंदा या विमानांची संख्या वाढवून 38 करण्यात आली आहे. लष्कराच्या ध्रुव हेलिकाँप्टरच्याही कसरती यंदा दिसणार आहेत.
7. आय इन द स्काय अशी ओळख असलेलं भारतीय हवाईदलाच्या निगराणी पथकाची शान असलेलं नेत्र हे उपकरण यंदा पहिल्यांदाच राजपथावरच्या आकाशात घोंगावताना दिसेल.
8. भारत-आसियान संबंधांचा इतिहास सांगणारे दोन चित्ररथ यंदाच्या परेडमध्ये सामील करण्यात आले आहेत. कंबोडिया, मलेशिया, थायलंड या देशातल्या कथ्थक आणि इतर लोककलांचं मनोहारी दृश्य त्यानिमित्तानं पाहायला मिळणार आहे.
9. डीआरडीओन नुकतंच विकसित केलेल्या निर्भय या क्षेपणास्त्राची आणि अश्विनी या रडार उपकरणाची पहिली झलक यंदा राजपथावर पाहायला मिळणार आहे.
10. महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला आहे.‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।‘ या कविराज भूषण यांच्या वीररसानं भरलेल्या काव्याच उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा हा चित्ररथ राजपथावर येईल. कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या दिल्लीनं छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरेल.
संबंधित बातम्या :
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं वैभव देशाला दाखवणारा चित्ररथ कसा असेल?