नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येत पाच एकर जागेवर बनणाऱ्या मशीदीचं नाव नेमकं काय असणार याची उत्सुकता आहे. या मशिदीसाठी काही वेगवेगळी नावं सुचवली जात आहेत, पण सर्वाधिक पसंती आहे.धन्नीपूर मशीद या नावाला आणि हेच नाव अंतिम होण्याची शक्यता आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे प्रवक्ते अतार हुसैन यांनी ही माहिती दिली आहे.


अयोध्येपासून 20 किलोमीटर अंतरावर धन्नीपूर या गावात मशिदीसाठी जागा सरकारनं दिली आहे. मंदिर निर्मितीसाठी 70 एकर जागा देतानाच, मशीदीसाठी इतरत्र 5 एकर जागा द्यावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. या पाच एकर जागेत मशीद, शैक्षणिक संकुल, हॉस्पिटल आणि एक कम्युनिटी किचन उभारण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. शिवाय या मशीदीचं नाव बाबरी मशीद नसणार हे आम्ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलेलं आहे. कुठल्या शासकाच्या नावानं मशीद ओळखली जाणार नाही, कारण त्यावरुन आम्हाला कुठलाही वाद नको आहे असं इस्लामिक फाऊंडेशनच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.


या मशिदीसाठी सुफी मशीद, अमन मशीद अशीही काही नावं सुचवली गेली आहेत. पण त्यातही धन्नीपूर या गावाच्या नावावरच अनेकांची सहमती आहे. शक्यतो मशिदीचं नाव हे धर्माच्या किंवा जागेच्या नावावरुनच असतं. त्याच प्रथेला धरुन हे नाव पुढे आलं आहे. दरम्यान राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच एमआयएमचे असदुद्दीनं ओवैसी यांनी बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार असं विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर फाऊंडेशनची ही भूमिका महत्वाची आहे. सुप्रीम कोर्टानं वादग्रस्त जागा सोडून इतरत्र मशीदीसाठी जागा देण्यास सांगितलं होत, ही जागा अयोध्या शहरापासून दूर 20 किमी अंतरावर आहे. सरकारकडून ही जागा स्वीकारण्यासही काही इस्लामिक नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मशीद ही वादग्रस्त जागेवर किंवा दान दिलेल्या जागेवर नसावी असं काहींचं म्हणणं होतं.