तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्याविरोधात केरळमधील तिरुवनंतपुरम येथील स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. आपल्या पुस्तकातून महिलांचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने हे वॉरट जारी केलं आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
शशी थरुर यांच्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल' या पुस्तकातील मजकुरावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकातून महिलांचा अपमान केल्याचा आरोप शशी थरुर यांच्यावर होत आहे. याप्रकरणी शनिवारी पहिल्यांदा न्यायालयात सुनावणी झाली. शशी थरुर यांना समन्स जारी करण्यात आलं होतं. तरीही शशी थरुर किंवा त्यांच्यावतीने कुणीही वकील न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर शशी थरुर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, काही दिवसांपूर्वी न्यायालयाने शशी थरुर समन्स जारी केलं होतं. समन्ममध्ये वेळ लिहिण्यात आली होती, मात्र तारीख लिहिलेली नव्हती.
काही दिवसांपूर्वी साहित्य अकादमीने शशी थरुर यांच्या 'अॅन एरा ऑफ डार्कनेस' या पुस्तकासाठी पुरस्काराची घोषणा केली. पुढील वर्षी 25 फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शशी थरुर यांनी 2016 मध्ये हे पुस्तक लिहिलं होतं. शशी थरुर यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच लिखाणाला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांची दोन डझनहून अधिक पुस्तकं छापली गेली आहेत.