नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीतल्या रामलीला मैदानातून प्रचाराला आजपासून (22 डिसेंबर) प्रारंभ करणार आहेत. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्य या आंदोलनांच्या केंद्रस्थानी आहेत. दोन्ही राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून हिंसक आंदोलनं सुरु आहेत. अशा परिस्थितीत मोदी आज दिल्लीत सभा घेत आहेत, त्यामुळे या सभेसाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


एकीकडे दिल्लीत केंद्र सरकारविरोधात, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जोरदार आंदोलनं होत असताना मोदी स्वतः दिल्लीत सभा घेणार आहेत. त्यामुळे मोदी या भाषणात काय बोलणार? नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी, देशभरात सुरु असलेली आंदोलनं याबाबत काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


दिल्लीतल्या 1731 अनधिकृत वसाहती अधिकृत करण्याच्या प्रमुख मुद्द्यावर आजची सभा आयोजित करण्यात आली आहे. मोदींच्या आजच्या सभेला जवळपास दोन लाख लोक उपस्थित असतील, यासाठी दिल्लीत भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रामलीलावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.


नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये (विद्यापीठ) निदर्शनं झाली. यावेळी जामियामध्ये हिंसाचारही झाला. मोदी-शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर मोदींची आजची रामलीलामधली सभा ही सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.


फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीत पुन्हा एकदा यश मिळावं, यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोफत वीज आणि पाण्याची घोषणा केली आहे. त्यासोबत केजरीवाल यांच्याकडून इतरही अनेक घोषणांचा सपाटा सुरु आहे. परंतु दिल्लीतल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीला यावेळी भाजपचं कडवं आव्हान असणार आहे. केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी भाजपची काय रणनिती असणार, याचा अंदाज आजच्या रामलीलामधील सभेनंतरच लावता येणार आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचंही मोदींच्या आजच्या सभेकडे लक्ष आहे.