नवी दिल्ली : देशात आजपासून (1 ऑक्टोबर) पाच मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) खातेधारकांना खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या अटीमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून ईटीसी अर्थात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सुरु होणार आहे.
एसबीआयकडून खातेधारकांना दिलासा
एसबीआयने मेट्रो शहरांमध्ये खात्यात किमान रक्कम ठेवण्याची मर्यादा 5 हजारांहून 3 हजार रुपये केली आहे. यामुळे जवळपास 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल. शिवाय यावरील दंडाच्या रक्कमतेही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी किमान रक्कम न ठेवल्यास 40 ते 100 रुपये वसूल केले जात होता. त्यावर सर्व्हिस टॅक्सही होता. मात्र आता ही मर्यादा 30 ते 50 रुपये करण्यात आली आहे.
सततचा विरोध आणि सरकारच्या आवाहनानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला. एसबीआयने पेन्शन धारक, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि अल्पवयीन खातेधारकांना किमान रक्कम ठेवण्याच्या मर्यादेतून बाहेर ठेवलं आहे.
जुनं खातं बंद करण्यासाठी फी नाही
एसबीआयमधील खातं बंद करण्यासाठी फी लागणार नाही. मात्र खातं एका वर्षापेक्षा अधिक दिवसांचं असणं गरजेचं आहे. एखादं खातं 14 दिवसांनंतर आणि एका वर्षाच्या आत बंद केल्यास 500 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल.
जुने चेक रद्द
ज्या ग्राहकांकडे एसबीआयमध्ये मर्ज झालेल्या बँकांचे चेक आहेत, ते चेक यापुढे अमान्य करण्यात येतील. या बँकांचे जुने चेक आणि आयएफएससी कोड 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत.
राष्ट्रीय महामार्गांवर ईटीसी
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर आजापासून ईटीसी प्रणाली सुरु होणार आहे. तुमच्या गाडीवर आरएफआयडी असेल तर तुम्हाला टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही.
कॉल रेट स्वस्त होण्याची शक्यता
तुमचं मोबाईल बिल आजपासून स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण ट्रायने नुकताच इंटरकनेक्शन चार्जचे दर (आययूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हा चार्ज 14 पैसे प्रती मिनिटांहून 6 पैसे प्रती मिनिट करण्यात आला आहे.
आययूसी चार्ज म्हणजे काय?
इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल जोडण्यासाठी आययूसी द्यावा लागतो. हा चार्ज सध्या 14 पैसे होता. मात्र आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी हा चार्ज वाढवण्याची मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती.
आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता.