मुंबई : नवीन वर्ष म्हटलं की सर्वांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. नवे संकल्प ठरतात आणि त्या संकल्पांच्या पूर्तीसाठी आपण नव्या उमेदीने कामाला लागतो. 2019 या वर्षात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल घडतील, तसेच देशभरातही अनेक बदल घडत आहेत. नव्या वर्षात कोणकोणते बदल झाले, याचा घेतलेला आढावा


नवे वर्ष, नवे बदल

1. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी :  एक जानेवारीपासून राज्यात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत आहे. जानेवारी महिन्याचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना 1 फेब्रुवारी रोजी मिळेल. राज्यातील एकूण 20 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

2. मनोरंजन स्वस्त : जीएसटीमध्ये बदल झाल्यामुळे टीव्ही, सिनेमाचं तिकीट यासारखे मनोरंजनाचे पर्याय स्वस्त झाले आहेत.

3. मॅगस्ट्राईप कार्ड : जुनी मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला आजपासून वापरता येणार नाहीत. आरबीआयच्या निर्देशानुसार मॅग्नेटिक स्ट्राईप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत.

4. सीटीएस चेक आवश्यक : एक जानेवारीपासून नॉन-सीटीएस चेक रद्दबातल ठरत आहेत. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, पीएनबी, बँक ऑफ बरोडासारख्या सर्व बँकांमध्ये फक्त सीटीएस चेक वैध ठरतील. सीटीएस म्हणजे चेक ट्रंकेटेड सिस्टम. म्हणजेच चेकची एका बँकेतून दुसरीकडे होणारी प्रत्यक्ष आदानप्रदान बंद होणार असून व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक इमेज तयार करण्यात येईल.

5. अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला 15 लाख : एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपये मिळतील. 'IRDAI'ने सर्व विमा कंपन्यांना 15 लाखांचा विमा उतरवण्याचे निर्देश दिले आहेत.

6एनपीएस करमुक्त : राष्ट्रीय पेन्शन योजना करमुक्त करण्यात आली आहे. एनपीएसमधून 60 टक्के रक्कम काढता येणार आहे.

7. आधारकार्डवरील नाव, पत्ता बदलणं सोपं आधारकार्डावर नाव, पत्ता बदलण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. ऑनलाईन आधार कार्ड सुधार पोर्टल तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवेल.

8. सर्वच कंपन्यांच्या कारच्या किमती महागणार : टोयोटा, इसुझू, मारुती सुझुकी यासारख्या बहुतांश कंपन्यांच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

9. आयटीआर रिटर्न न भरल्यास दुप्पट दंड : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा भरण्याची 31 ऑगस्ट 2018 चुकवल्यानंतर  31 डिसेंबरची तारीखही 'मिस' करणाऱ्यांना आता दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उशिराने भरलेल्या आयकर परताव्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. 31 डिसेंबरपूर्वी पाच हजार रुपयांचा दंड आता दहा हजारांवर जाणार आहे.

10. मस्जिद बंदरवरचा फूट ओव्हर ब्रिज खुला : मुंबईत मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्टेशनवर असलेला फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल) आजपासून सर्वांसाठी खुला झाला आहे

11. विदेशी मद्य 18 ते 20 टक्के महाग : परदेशी मद्य 18 ते 20 टक्क्यांनी महागलं आहे. विदेशी दारुच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे किमती वाढल्या आहेत.