पणजी : स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दीर्घकाळ उपचार घेऊन आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात पोहोचले. 29 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर आज मंत्रालयात पोहोचल्याचे सांगितलं जात आहेत.
अमेरिकेत तिसऱ्यांदा उपचार घेऊन सप्टेंबरमध्ये गोव्यात आल्यापासून मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊ शकले नव्हते. गेल्यावर्षी अर्थसंकल्प मांडण्यासाठी आजारी असून देखील पर्रिकर यांनी स्वत: अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर मुंबई आणि दिल्ली येथे उपचार घेऊन गोव्यात परतल्यानंतर ते आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानातून कामकाज पाहत होते.
मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला सातत्याने घेरण्याची मोहीम हाती घेतली. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आरोग्याची माहिती मिळावी यासाठी काहींनी न्यायालयात धाव घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सह्यांवरुन देखील जोरदार आरोप होऊ लागले आहेत.
एम्समधून परतल्यानंतर दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी पर्रिकर यांनी 2 वेळा मंत्रिमंडळ बैठक, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बैठक, भाजप पदाधिकारी बैठक घेऊन आपले कामकाज सुरु असल्याचे दाखवून दिले होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सुरेश प्रभू यांनी पर्रिकर यांच्या घरी जाऊन विकास कामांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे.
पणजी येथे मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाची आणि झुवारी पुलाची पाहणी करण्यासाठी पर्रिकर बऱ्याच महिन्यांनंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर आज प्रथमच पर्रिकर घराबाहेर पडून मंत्रालयात पोहोचले. मनोहर पर्रिकर यांच्या नाकात सलाइनची नळी असून डॉक्टरही सोबत आहेत.