अलाहाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारवर निशाणा साधला आहे. यूपी सरकार विकासाऐवजी जातीचं राजकारण करते. तर मोदी सरकार असे रस्ते बनवत आहेत, ज्यावर 200 वर्षांपर्यंत खड्डे पडणार नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.
अलाहाबादमधील एका कार्यक्रमात नितीन गडकर बोलत होते. "मोदी सरकार जे रस्ते बनवत आहेत, त्यावर कधीही खड्डे पडणार नाहीत. कारण या रस्त्यांच्या बांधकामात लाचखोरी होत नाही. यूपीला देशातील अव्वल क्रमांकाच राज्य बनवण्याची मोदी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे विकासकामांना प्राधान्य दिलं जात आहे," असं नितीन गडकरी म्हणाले.
"विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश फारच मागासलेला आहे. त्यामुळे या राज्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे," असंही गडकरींनी नमूद केलं.
दरम्यान यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अलहाबादला अनेक भेटी दिल्या. अलाहाबादसाठी 317.91 कोटी रुपयांच्या तीन योजना जाहीर केल्या. वाराणसीपासून हल्दियापर्यंत जलमार्गाचा विस्तार अलाहाबादपर्यंत करण्याची मोठी घोषणाही गडकरी यांनी केली. या जलमार्गासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, "केंद्र सरकार देशात सिमेंट आणि काँक्रिटच्या नव्या पद्धतीने असे रस्ते बनवणार आहे, ज्यावर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत." गडकरींनी यावेळी अलाहाबाद प्रतापगड एनएच 96चं चौपदरीकरण, अलाहाबादपासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत एनएच 27 चं रुंदीकरणाचं भूमीपूजन केलं. 41.719 किमी लांबीच्या या हायवेला 774.57 कोटी रुपये खर्च येणार आहे."
यासोबतच फाफामऊमध्ये गंगा नदीवर सहापदरी पुलाचं भूमीपूजनही गडकरी यांनी केलं. या पुलासाठी 1800 कोटींचा निधी निश्चत केला आहे.
नितीन गडकरींनी अलाहाबादपासून जौनपूर मार्गे गोरखपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. या महामार्गाच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी जाहीर केला आहे.
तर झूंसीकडे गंगा नदीवर आठ पदरी पूल बनवण्यासही नितीन गडकरींनी मंजुरी दिली आहे. तसंच गडकरींनी 2019 मध्ये अलाहाबादमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याआधीच सर्व काम पूर्ण करण्याची घोषणा केली.