नवी दिल्ली: बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सैफ अली खान आणि करीन कपूर यांना आज पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. करीनाने आज सकाळी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. या नव्या पाहुण्याचे नामकरण करीना आणि सैफने तैमूर अली खान पटौदी असे केले.


सैफने याची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. #TaimurAliKhan च्या हॅशटॅगने अनेकांनी ट्वीट करुन सैफ आणि करीनाचे अभिनंदन केले. पण या नव्या पाहुण्याच्या नावावरुन आता काहींनी प्रश्न उपस्थीत करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनी तैमूर नाववरुन सोशल मीडियावर आक्षेप नोंदवला आहे.


चित्रपट निर्माता करण जोहरच्या ट्वीटला रिट्वीट करुन तारीक फतेह म्हणाले की, ''करीन आणि सैफ यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. हे ऐकून आनंद झाला. पण याच नावाच्या व्यक्तीने हिंदूंचे शिरकाण केले होते?'' असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सैफ आणि करीनाच्या पुत्ररत्नाची बातमी करन जोहरने ट्वीटरवरुन शेअर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे म्हटले होते.



दरम्यान, तारीक फतेह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे करण जोहरने उत्तर दिले नसले, तरी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मात्र तारीक फतेह यांना प्रत्युत्तर दिले आहे. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ''मुलाचे नामकरण करण्याचा अधिकार त्याच्या आई-वडिलांना आहे. त्यामुळे इतरांची मते कोणी ग्राह्य धरत नसल्याचे,'' ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.