नवी दिल्ली : आजपासून जुन्या पाचशे, हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत. या नोटा बँकेत तुमच्या खात्यात भरुन तुम्ही एटीएम, बँक स्लीप किंवा चेकद्वारे काढू शकाल. केंद्र सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे उद्यापासून फक्त 500 च्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत महत्वाच्या ठिकाणी चालणार आहेत. त्यामुळे हजारच्या नोटा बँकेतच जमा कराव्या लागतील.
नोटाबंदीसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय :
– बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेता येणार नाहीत. या निर्णयामुळे ज्यांचं बँकेत खातं नाही, अशा नागरिकांना खाते उघडता येईल. या खात्यामध्ये आपल्याकडील जुन्या नोटा जमा करता येतील.
– महत्वाच्या ठिकाणी फक्त पाचशेच्या जुन्या नोटा चालतील
– महापालिका, सरकारी शाळांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच्या फीसाठी जुन्या पाचशेच्या नोटा चालतील. त्यासाठी अधिकच्या रकमेसाठी चेकचा वापर करावा.
– प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी पाचशेच्या नोटा चालतील.
– घरगुती पाणी आणि वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.
– वाहतूक मंत्रालयाकडून 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र 3 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत टोल नाक्यांवर जुन्या 500 च्या नोटा स्वीकारल्या जातील.
– परदेशी नागरिकांना फॉरेन एक्स्चेंज काऊंटरवर 5 हजार रुपये प्रति आठवड्याला बदलून मिळतील.
जुन्या नोटांचं काय होणार?
जुन्या पाचशेच्या नोटा जीवनावश्यक ठिकाणी म्हणजे पेट्रोलपंप, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत चालतील. मात्र हजारच्या नोटा या ठिकाणी चालणार नाहीत. जुन्या हजारच्या नोटा फक्त बँकेतच जमा कराव्या लागतील. त्या नोटा तुम्हाला एटीएम, बँक स्लीप, किंवा चेकद्वारे काढता येतील.
जुन्या पाचशेच्या नोटा कुठे चालणार?
पेट्रोलपंप, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार आहेत. शिवाय प्री पेड मोबाईल रिचार्जसाठी देखील पाचशेची नोट चालणार आहे. सरकारी शाळांची फी भरण्यासाठीही पाचशेच्या नोटा चालतील.
आता सुट्टे पैसे कुठून मिळतील?
– बँकांमधून सुट्टी पैसे मिळत राहणार
– पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करुन मिळणार
– बिग बाझारमध्येही कार्डद्वारे पैसे मिळण्याची सोय
– शेतकऱ्यांच्या जुन्या 500 च्या नोटा बियाणे दुकानात स्वीकारतील